Wednesday 1 July, 2009

इतिहासाचा इतिहास................

मधली सुट्टी संपली आणी आम्ही सगळे बाकावर येवुन बसलो. बागेवाडी मॅडमचा तास होता, काल त्यानी १० प्रश्नांची उत्तरे लिहून आणायला सांगीतली होती. तास सुरु होण्याच्या ५ मिनीटे आधी मानसीला आठवले की तीने घरचा अभ्यास केला नाहीये. बागेवाडी मॅडमनी दीलेला घरचा अभ्यास न करणे म्हणजे वाघाच्या गुहेत आपणहून प्रवेश करणे.
तीने पटापट माझ्या वहीतुन उत्तरे लिहायला सुरुवात केली, तेव्हढयात मॅडम वर्गात प्रवेशल्या. नेहेमीप्रमाणे त्यांनी प्रथम घरचा अभ्यास तपासायला सुरुवात केली. मानसी दुसरया रांगेत पहिल्या बाकावर आणि मी त्याच रांगेत तिसरया बाकावर बसत असे. पहिली रांग पूर्ण झाली आणी त्या आमच्या रांगेत वह्या तपासु लागल्या, मानसीची अपुर्ण वही पाहून तीला उभे राहायला सांगीतले आणि क्षणात तीच्या गालावर त्यांची बोटे उमटली. तसेच मानसी जीच्या वहीतुन घरचा अभ्यास उतरवुन काढत होती तीला म्हणजे मलाही उभे राहायला सांगीतले. आता आपल्याला पण गालावर प्रसाद मिळणार या विचाराने माझे पाय लटपटायलाच लागले. दुसरया बाकावरच्या मुलींच्या वह्या तपासून मॅडम माझ्याजवळ आल्या आणी माझ्या पाठीवर एक जोरात धपाटा घालुन पुढे गेल्या. हुश्श्य...........थोडक्यात वाचले.
मानसी मात्र खूपच दु:खी झाली होती, नंतरच्या एकाही तासाला तीचे लक्ष लागले नाही. तीच्यामुळे मला मार मिळाला म्हणुन मीही तिच्यावर थोडी रागावले. शाळा सुटेपर्यंत राग कमी झाला आणी आम्ही दोघी घरी जायला निघालो. मानसीच्या डोक्यात अजुनही इतिहासाचा तासच होता, ती म्हणाली, बागेवाडीमॅडम खुपच खडूस आहेत. नेहेमी तर माझा अभ्यास पुर्ण असतो आज एक दीवस विसरले म्हणुन लगेच कशाला मला मारायचे.( त्या घरचा अभ्यास न केलेल्या सगळ्यानांच असे धोपटुन काढत, त्यांना कोणतीही सबब चालत नसे) घरी जायच्या वाटेत एक मारुतीचे देऊळ होते. तिथे बसुन आम्ही बरेचदा महत्वाच्या गोष्टींची चर्चा करत असु. आम्ही तीथे या अपमानाचा कसा बदला घ्यायचा हा विचार करत होतो. बर्‍याच वेळ विचार करुनही काही सुचत नव्हते, म्हणून मग आम्ही ठरवले की आपण मोठे झाल्यावर शिक्षीका व्हायचे आणि बागेवाडी मॅडमच्या नातवंडांना आपण असेच मारायचे म्हणजे ती त्यांना सांगतील की आम्हाला आमच्या मॅडमनी मारले आणि मगच त्यांना कळेल की मुलांना वर्गात मारले की कसे वाईट वाटते.
पण त्यानंतर आमचा दोघींचाही कधीही इतिहासाचा घरचा अभ्यास करायचा राहीला नाही.